स्वच्छता दूत डॉ. लहू काकडे यांचे 'नखे कापा' अभियान: एक प्रेरणादायी उपक्रम
स्वच्छता दूत डॉ. लहू काकडे यांचे 'नखे कापा' अभियान: एक प्रेरणादायी उपक्रम
दि. २९ (डॉ. दत्तात्रय शिंदे)
अकोले, अहिल्यानगर: अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील डिकसळ या छोट्या खेडेगावातील सुपुत्र आणि सध्या अकोले तालुक्यातील आदिवासी भागातील ॲड. एम.एन. देशमुख महाविद्यालय, राजूर येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले डॉ. लहू काकडे यांनी 'नखे कापा' हे एक अभिनव स्वच्छता अभियान गेल्या वर्षभरापासून सुरू केले आहे. स्वच्छतेच्या या अनोख्या प्रयत्नाने त्यांनी अनेकांना प्रेरणा दिली आहे.
या अभियानाची सुरुवात एका हृदयस्पर्शी घटनेतून झाली. डॉ. काकडे यांच्या ऐंशी वर्षीय वडिलांच्या हाता-पायाची वाढलेली, जाड झालेली आणि घाण साचलेली नखे पाहून त्यांचे मन व्यथित झाले. वडिलांची वाढलेली नखे काढण्यासाठी त्यांनी एक नेल कटर किट विकत घेतले आणि येथूनच 'नखे कापा' या अभियानाची मुहूर्तमेढ रोवली गेली.
नोकरी सांभाळून त्यांना जेव्हाही मोकळा वेळ मिळतो, तेव्हा ते आपले नेल कटर किट सोबत घेतात आणि भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची, विशेषतः साठ वर्षांवरील वयस्कर व्यक्तींची, हाता-पायाची नखे स्वतः कापून देतात. महिला, पुरुष, वयस्कर नागरिक आणि लहान मुले अशा सर्वांची नखे स्वच्छ करण्याचे हे काम त्यांनी गेल्या वर्षभरापासून अविरतपणे सुरू ठेवले आहे.
डॉ. काकडे यांच्या मते, नखांमधील घाणीमुळे अनेक आजार होऊ शकतात. हे आजार टाळण्यासाठी आणि वयस्कर लोकांची सेवा करण्याच्या उदात्त हेतूने त्यांनी हे अभियान हाती घेतले आहे. आतापर्यंत त्यांनी सुमारे सातशे ते आठशे लोकांची नखे स्वतः कापून स्वच्छ केली आहेत.
डॉ. काकडे यांचे हे 'नखे कापा' अभियान पाहून अनेक लोक प्रभावित झाले आहेत आणि या अभियानात सहभागी झाले आहेत. त्यांनी सर्वांना या स्वच्छता कार्यात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. डॉ. लहू काकडे यांचा हा प्रयत्न खरोखरच कौतुकास्पद असून, समाजासाठी एक आदर्श उदाहरण आहे.
Comments
Post a Comment