शब्दांच्या दिवाळी फराळाची गंमतच न्यारी - माजी विधानसभा अध्यक्ष अरुण गुजराथी दिवाळी अंक स्पर्धेचे पारितोषिक वितरण उत्साहात
*शब्दांच्या दिवाळी फराळाची गंमतच न्यारी - माजी विधानसभा अध्यक्ष अरुण गुजराथी*
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : शब्दांमुळे सुख दुःख हलके होते. त्यामुळे शब्दांचे महत्व अनन्यसाधारण आहे. त्यातच जेव्हा हे शब्द दिवाळी सणासोबत आनंदाची पखरण करायला घरात येतात तेव्हा शब्दांच्या दिवाळी फराळाची गंमतच न्यारी होते, असे प्रतिपादन राज्याचे माजी विधानसभा अध्यक्ष अरुण गुजराथी यांनी मुंबई येथे केले. जीवनात पद राहत नाही तर जीवनातील पत महत्वाची असते, आणि माणुसकीची पत लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी राखली आहे, असे गौरवोद्वारही त्यांनी काढले.
शैक्षणिक, सामाजिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि मुंबई मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या २०२१ आणि २०२२ च्या राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ मुंबईत पार पडला.
मुंबई मराठी पत्रकार संघ आणि श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या संघाच्या सभागृहात झालेल्या या सोहळ्यास विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, पानिपतकार विश्वास पाटील, मराठी पत्रकार संघाचे विश्वस्त राही भिडे, श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे उपाध्यक्ष अरुणशेठ भगत, रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचे जनरल सेक्रेटरी वाय. टी. देशमुख, श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे सचिव परेश ठाकूर, भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे, माजी अध्यक्ष देवदास मटाले, स्पर्धा समन्वयक दीपक म्हात्रे, कार्यवाह संदीप चव्हाण ज्येष्ठ पत्रकार नीला उपाध्ये, शैलेंद्र शिर्के, अर्थतज्ञ जे. डी. तांडेल, जगदीश भौड यांच्यासह महाराष्ट्रातील प्रकाशक, संपादक, वितरक, साहित्यिक आणि वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दिवाळी अंक ही महाराष्ट्राची पूर्वापार चालत आलेली एक सांस्कतिक परंपरा आहे. ही परंपरा अखंडपणे चालू राहावी व त्यातून दर्जेदार दिवाळी अंकांची निमिर्ती व्हावी, यासाठी श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि मुंबई मराठी पत्रकार संघ यांच्यावतीने महाराष्ट्रातील सर्वात मोठया दिवाळी अंक स्पर्धेचे आयोजन करण्यात येते आणि या स्पर्धेला राज्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभतो. त्यामुळे दिवाळी अंकांच्या ११२ वर्षांच्या परंपरेत खंड पडला नाही. सन २०२१ च्या अर्थात २१ व्या राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेत नाशिक येथील अंकुर काळे यांच्या 'दुर्ग' अंकाने प्रथम क्रमांक पटकाविला. पुणे येथील डॉ. वंदना बोकील - कुलकर्णी यांच्या 'संवाद सेतू' आणि पुणे येथील हेमंत पोतदार यांच्या 'व्यासपीठ' अंकाने द्वितीय (विभागून), तृतीय क्रमांक (विभागून) जळगाव येथील नामदेव कोळी यांच्या 'वाघूर' आणि सोलापूर येथील इंद्रजित घुले यांच्या 'शब्दविचार' अंकाने मिळविले. तसेच उत्कृष्ट कथेचे बक्षिस 'अक्षरधारा' अंकातील 'देव करो' या कथेने, उत्कृष्ट कविता 'शब्दरूची' दिवाळी अंकातील सदानंद डबीर यांनी, उत्कृष्ट गजानन व्यंगचित्र घोंगडे यांनी, उत्कृष्ट विशेषांक दिनकर शिलेदार यांच्या मी' अंकाने तर उत्कृष्ट मुखपृष्ठाचे बक्षिस रामनाथ आंबेरकर यांच्या " किल्ला' या अंकाने पटकाविला. या स्पर्धेचे परिक्षक म्हणून प्रतिभा सराफ, रविप्रकाश कुलकर्णी, अरविंद दोंदे, श्रीकांत नाईक या साहित्यिक मंडळींनी काम पहिले.
रायगड जिल्हास्तरीय स्पर्धेत शारदा धुळप यांच्या 'साहित्यआभा' अंकाने प्रथम क्रमांकाचा मान मिळविला. द्वितीय क्रमांक प्रमोद वालेकर यांच्या 'दैनिक किल्ले रायगड' अंकाने तृतीय क्रमांक शुभदा पोटले यांच्या 'दि म्हसळा टाईम्स' दिवाळी अंकाने तर उत्तेजनार्थ बक्षिस रत्नाकर पाटील यांच्या 'श्री समर्थ विचार' आणि नाना करंजुले यांच्या 'कर्तृत्व' अंकाने पटकाविले.
सन २०२२ च्या अर्थात २२ व्या राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेत 'दीपावली' अंकाने प्रथम क्रमांक पटकावीत सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक होण्याचा सन्मान पटकाविला. 'पद्मगंधा' अंकाने द्वितीय तर 'दै. उद्याचा मराठवाडा मुक्तपर्व' अंकाने तृतीय क्रमांक प्राप्त केला. तसेच सर्वोत्कृष्ट विशेषांक होण्याचा मान 'सकाळ स्वराभिषेक' अंकाने सर्वोत्कृष्ट बालसाहित्यिक अंक 'वयंम्', उत्कृष्ट दिवाळी अंक म्हणून 'आंतरभारती' उत्कृष्ट कथेचे बक्षिस अक्षर दिवाळी अंकातील 'काम तमाम वाघा बॉर्डर या लेखक सतीश तांबे. यांच्या कथेने, उत्कृष्ट कविता वाघूर दिवाळी अंकातील कवी विनय पाटील यांच्या एक थोराड झाड या कवितेने, उत्कृष्ट मुखपृष्ठ उत्तम अनुवाद दिवाळी अंकाने तसेच उत्कृष्ट व्यंगचित्र 'मार्मिक' अंकातील गौरव सर्जेराव यांच्या व्यंगचित्राने पटकाविले. याशिवाय सर्वोत्कृष्ट लेख कालनिर्णय दिवाळी अंकातील निळू दामले यांच्या विल्यम शॉन या लेखाने, लक्षवेधी परिसंवाद अंतरीचे प्रतिबिंब दिवाळी अंकातील अक्षय ऊर्जाने, लक्षवेधी मुलाखत म्हणून दिलीप माजगावकर, संवादक दिलीप प्रभावळकर- शब्दमल्हार दिवाळी अंकाने पटकाविले. राज्यभरातून उदंड प्रतिसाद लाभलेल्या या स्पर्धेसाठी ज्येष्ठ साहित्यिक प्रा. विजय तपास, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सचिव व कवयित्री चित्रकार मिनाक्षी पाटील, सुप्रसिद्ध सुलेखनकार सुनील धोपावकर यांनी परीक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली.
साल २०२२ साठी रायगड जिल्हास्तरीय स्पर्धेत 'साहित्यआभा' अंकाने प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक 'दैनिक किल्ले रायगड अंकाने तृतीय क्रमांक 'आगरी दर्पण' अंकाने तर उत्तेजनार्थ बक्षिस 'साप्ताहिक माणगंगा आणि 'साप्ताहिक कोकणनामा' अंकाने पटकाविले असून उत्कृष्ट कथा 'दि म्हसळा टाइम्स' मधील सु. पुं. अढाऊकर यांच्या खारे बिस्कुट कथेने उत्कृष्ट कविता स. कोकणनामा मधील मनश्री उल्हास पवार यांच्या आई- बाबा कवितेने, तर उत्कृष्ट व्यंगचित्र साहित्य आभा अंकातील व्यंगचित्रकार विवेक मेहेत्रे यांच्या व्यंगचित्राने पटकाविले. या सोहळ्यात शतकोत्सव साजरा करणाऱ्या 'मौज' दिवाळी अंकाचा विशेष सन्मान करण्यात आला.
*बक्षिसांचे स्वरूप :-* राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेमधील विजेत्या प्रथम क्रमाकांस १ लाख रुपये, द्वितीय क्रमाकांस ५० हजार तर तृतीय क्रमाकांस ३० हजार रूपये तसेच या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट विशेषांकासाठी १५ हजार रुपये, बालसाहित्य अंकासाठी ७५०० रुपये, उत्कृष्ट दिवाळी अंकासाठी १५ हजार रुपये, उत्कष्ट कथा, उत्कृष्ट कविता, उत्कृष्ठ मुखपृष्ठ व उत्कृष्ट व्यंगचित्रासाठी प्रत्येकी ३ हजार रुपये, त्याचबरोबर सर्व विजेत्यांना सन्मानचिन्ह. रायगड जिल्हास्तरीय प्रथम क्रमांकास ४० हजार रूपये, द्वितीय क्रमांकास २० हजार रूपये आणि तृतीय क्रमाकांस १० हजार रूपये, दोन उत्तेजनार्थ प्रत्येकी ५ हजार रुपये आणि उत्कष्ट कथा, उत्कृष्ट कविता व उत्कृष्ट व्यंगचित्रासाठी प्रत्येकी ३ हजार रुपये आणि सर्व विजेत्यांना सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
Comments
Post a Comment