पालघर जिल्ह्यातील रेल्वे समस्या बाबत आमदार मनिषाताई चौधरींनी घेतली पश्चिम रेल्वे महाव्यवस्थापकांची भेट



*पालघर जिल्ह्यातील रेल्वे समस्या बाबत आमदार मनिषाताई चौधरींनी घेतली पश्चिम रेल्वे महाव्यवस्थापकांची भेट*

बोईसर (प्रतिनिधी)डहाणू ते वैतरणा स्थानकां दरम्यान भेडसावणाऱ्या रेल्वे समस्यांवर चर्चा करण्यासाठी दहिसर च्या आमदार मनिषाताई चौधरी यांनी पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक श्री. अशोक कुमार मिश्र यांची भेट घेतली. अपुऱ्या डहाणू उपनगरीय सेवा वाढविण्याची आग्रही मागणी महाव्यवस्थापकांकडे करण्यात आली.
सकाळी ७.०५ वाजता डहाणू रोड येथून सुटणारी लोकल कोविड काळात बंद करण्यात आली आहे. ही सेवा तात्काळ सुरू करण्यात यावी , तसेच सौराष्ट्र एक्सप्रेसच्या वेळेत बदल केल्यामुळे पालघर-डहाणू कडे येणाऱ्या शिक्षक वर्ग, महाविद्यालयीन विद्यार्थी , इतर प्रवाशी यांची गैरसोय होत आहे. या सर्वांच्या सोयीसाठी सकाळी  बोरिवली येथून नवीन डहाणू लोकल सुरू करावी अशी मागणी करण्यात आली.
सकाळी डहाणू वरून सुटणाऱ्या १०.१० व ११.३५ विरार लोकलच्या दरम्यान अतिरिक्त विरार-बोरिवली लोकल सुरू करण्याबाबत, तसेच दुपारी विरार वरून सुटणाऱ्या १२.२० व १.२० च्या डहाणू लोकल दरम्यान अतिरिक्त लोकल उपलब्ध करून देण्याबाबत ही सकारात्मक चर्चा झाली. विरार पर्यंत जाणाऱ्या लोकल बोरिवली, अंधेरी, चर्चगेट पर्यंत विस्तारित केल्यास प्रवाशी थेट मुंबई पर्यंत प्रवास करू शकतील याकडेही महाव्यवस्थापक श्री. मिश्र यांचे लक्ष वेधण्यात आले.
रात्रपाळी करून घरी परतणाऱ्या प्रवाशी वर्गासाठी डहाणू वरून अतिरिक्त मेमु सेवा उपलब्ध करून द्यावी तसेच गर्दीच्या वेळी अतिरिक्त डहाणू लोकल चालू केल्यास प्रवाशांची चांगली सोय होईल हे रेल्वे प्रशासनाला पटवून देण्यात आले.   

या सर्व मागण्या न्याय असून लवकरच डहाणू लोकल सेवा वाढवणार आहोत असे  आश्वासन महाव्यवस्थापक महोदयांनी आमदार मनिषाताई चौधरी यांना दिले.

पालघर जिल्हा मुख्यालय असून दिवसेंदिवस पालघर स्थानकात वाढणारी प्रवाशी संख्या तसेच अपेक्षित उत्पन्न असून सुद्धा पालघर स्थानकात लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबे दिले जात नसल्याबद्दल आमदार मनिषाताई चौधरी यांनी नाराजी व्यक्त केली. पालघर स्थानकात १६ वर्षानंतर दिलेले थांबे कोविड काळात काढण्यात आले. ते पूर्ववत करण्याव्यतिरिक्त पालघर स्थानकात अतिरिक्त थांबे मिळाले नसल्याचे महाव्यवस्थापकांच्या निदर्शनास आणण्यात आले. रेल्वे प्रशासनाने पुणे ते बिकानेर दरम्यान नवीन रेल्वे सेवा सुरू केली आहे. बिकानेर कडे जाणाऱ्या राणकपूर एक्सप्रेसला पालघर स्थानकातून सरासरी १ करोड चे उत्पन्न असून सुद्धा नवीन पुणे बिकानेर एक्सप्रेसला पालघर थांबा दिला गेला नाही. प्रवाशांच्या सेवेसाठी या गाडीला पालघर स्थानकात थांबा देण्याची मागणी करण्यात आली.
तसेच प्रवाशांच्या सेवे साठी महाराष्ट्र संपर्क क्रांती , दौंड इंदूर ,कछ एक्सप्रेस, भावनगर एक्सप्रेस सारख्या महत्त्वाच्या गाड्यांना पालघर स्थानकात थांबा देण्याची आग्रही मागणी महाव्यवस्थापकांकडे करण्यात आली. नव्याने सुरू होणाऱ्या गाड्या तसेच गणपती, दिवाळी तसेच सुट्टी दरम्यान धावणाऱ्या हॉलिडे स्पेशल गाड्यांना पालघर येथे थांबे देण्यात यावे तसेच पालघर येथे थांबे दिल्यामुळे डहाणू ते विरार भागातील प्रवाशांना मुंबई कडे प्रवास करण्याचे कष्ट वाचतील व बोरिवली स्थानकाचा भार कमी होईल या वस्तुस्थिती कडे आमदार मनिषाताई चौधरी यांनी महाव्यवस्थापकांचे लक्ष वेधले.
पर्यटन क्षेत्र, बागायती तसेच विविध शिक्षण संस्था असल्यामुळे घोलवड स्थानकात प्रवाशांची वर्दळ वाढली आहे मात्र अपुरी रेल्वे सेवा असल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. यासाठी संजान,उंबरगाव पर्यंत येणाऱ्या मेमु सेवा डहाणू पर्यंत विस्तारित करून लांब पल्ल्याच्या गाड्यांना घोलवड स्थानकात थांबा द्यावा अशी मागणीही करण्यात आली.
सर्व मागण्यांचा विचार करून पालघर स्थानकात लांब पल्ल्याच्या गाड्यांना  टप्याटप्याने तसेच हॉलिडे स्पेशल गाड्यांना प्राधान्याने थांबे देण्यात येणार असल्याचे आश्वासन महाव्यवस्थापकानीं दिले.
यावेळी निमिष सावे, रेल्वे बोर्ड सदस्य जय लदाराम नागवाणी, संकेत ठाकूर उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

डहाणू-नरपड ते चिखला मार्ग पुराच्या पाण्याने खचला; वाहतूक पूर्णपणे बंद, नागरिकांना प्रवास टाळण्याचे आवाहन

केळवा सागरी पो. ठाणे व्दारे बेकायदा जुगार खेळणाऱ्या वर धाड, आरोपी सह मुद्देमाल ताब्यात

केळवेत अपघाती मृत्यूनंतर नागरिकांमध्ये संताप; चौकशीची मागणी