निराधार महिलेच्या घरावर अतिक्रमण करणाऱ्यांविरोधात पालघर पोलिसांत गुन्हा दाखल; भूमिपुत्र एल्गार संघटनेच्या पाठपुराव्याला यश
निराधार महिलेच्या घरावर अतिक्रमण करणाऱ्यांविरोधात पालघर पोलिसांत गुन्हा दाखल; भूमिपुत्र एल्गार संघटनेच्या पाठपुराव्याला यश
पालघर,(प्रतिनिधी )दि. 25 जून 2026 :
पालघर तालुक्यातील वदलीपाडा, देवीषा रोड येथे राहणाऱ्या एका निराधार महिलेच्या घरावर जबरदस्तीने कब्जा करून तिला त्रास देणाऱ्या नातेवाईकांविरोधात अखेर पालघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रमीला डिक्कर (वय 53) या महिला एकट्या राहत असून घरकाम करून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांच्या नावे असलेल्या घराचे कुलूप नातेवाईकांकडून वारंवार तोडण्यात येत होते. आतापर्यंत तीन वेळा घराचा लॉक तोडून जबरदस्तीने घरात प्रवेश करण्यात आला होता. 24 जून रोजी त्या घरी आल्या असता त्यांच्या घरात भावाचा मुलगा व सुना जबरदस्तीने राहत असल्याचे आढळून आले. यावेळी त्यांच्यासोबत वाद घालत शिवीगाळ व मारहाण करण्यात आल्याचा आरोप महिलेने केला.
या घटनेनंतर त्यांनी 112 क्रमांकावर संपर्क साधून पोलिसांची मदत मागितली होती. त्यानुसार 25 जून रोजी त्यांना पालघर पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले. यावेळी भूमिपुत्र एल्गार संघटनेच्या महिला टीमने सदर महिलेच्या मदतीसाठी पोलीस ठाण्यात उपस्थित राहून प्रकरणाची सविस्तर माहिती दिली.
पोलीस निरीक्षक उपस्थित नसल्याने थोरात साहेब यांची भेट घेऊन संपूर्ण प्रकार त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आला. त्यांनी तातडीने दखल घेत हे प्रकरण पालघर पोलीस ठाण्याचे अनंत पराड साहेब यांच्या निदर्शनास आणून दिले.
भूमिपुत्र एल्गार संघटनेचे अध्यक्ष प्रमोद भाऊ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संघटनेचे वकील बाबूदादा भिमानि यांच्या कायदेशीर मदतीने संबंधितांविरोधात ट्रेसपास (अनधिकृत प्रवेश) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईमुळे निराधार महिलेला न्याय मिळण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडले आहे.
यावेळी पालघर जिल्हा व तालुका नारीशक्ती महिला टीमचे पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये पालघर जिल्हा सरचिटणीस रेखा धांगडे, पालघर नारीशक्ती महिला प्रमुख कविता तुंबडा, पालघर तालुका नारी सचिव रुचिता सुतार, पालघर युवा प्रमुख नयन धांगडे, सफाळे विभाग नारीशक्ती महिला प्रमुख निकिता भोईर, उपप्रमुख सुनीता कोदे, वाडा तालुक्यातील नारीशक्ती महिला प्रतिनिधी चित्राताई व करुणाताई तसेच विकी घरत, साक्षात माजरेकर, मयूर घरत आदी उपस्थित होते.
निराधार महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी भूमिपुत्र एल्गार संघटनेने केलेल्या या पाठपुराव्याचे परिसरातून कौतुक होत आहे.
Comments
Post a Comment