पत्रकारांना धमकी देणाऱ्या खासदार संजय दिना पाटील यांच्यावर कारवाईची मागणी; पत्रकार संघटनांचा तीव्र निषेध

पत्रकारांना धमकी देणाऱ्या खासदार संजय दिना पाटील यांच्यावर कारवाईची मागणी; पत्रकार संघटनांचा तीव्र निषेध

मुंबई :(प्रतिनिधी )पत्रकारांना कथितरित्या जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपावरून खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात पत्रकार संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद, पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती आणि डिजिटल मीडिया परिषदेने या प्रकाराचा तीव्र निषेध केला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने दखल घेऊन संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष एस. एम. देशमुख यांनी केली आहे.
पत्रकार संघटनांच्या म्हणण्यानुसार, शिवसेना सोडून शिंदे गटात प्रवेश केलेल्या खासदार संजय दिना पाटील आणि अन्य खासदारांच्या भूमिकेबाबत माहिती घेण्यासाठी काही पत्रकार त्यांच्या निवासस्थानी गेले होते. यावेळी विचारलेल्या प्रश्नांवरून संतप्त झालेल्या खासदारांनी पत्रकारांशी कथितरित्या अर्वाच्य भाषेत संवाद साधत धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
“पुन्हा आलात तर मारून टाकीन”, अशा प्रकारची भाषा वापरण्यात आल्याचा दावा पत्रकार संघटनांनी केला आहे. लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला धमकावण्याचा हा प्रकार असून एका लोकप्रतिनिधीकडून अशी भाषा अपेक्षित नसल्याचे एस. एम. देशमुख यांनी म्हटले आहे.
खासदार संजय दिना पाटील यांना वाय दर्जाची सुरक्षा व्यवस्था असल्याचे सांगत, सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीतच जर अशी धमकी देण्यात आली असेल तर हा अधिक गंभीर विषय आहे. त्यामुळे त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेचाही आढावा घेऊन योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
यापूर्वीही खासदार संजय दिना पाटील यांनी “माझ्याकडे बॉम्ब आहे” तसेच “पाच खून केले आहेत” अशा स्वरूपाची वक्तव्ये केल्याचा आरोप पत्रकार संघटनांनी केला आहे. या वक्तव्यांची चौकशी करून सत्य समोर आणावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.
दरम्यान, पत्रकारांना धमकी देणे हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला असल्याचे सांगत पत्रकार संघटनांनी लोकशाही व्यवस्थेत अशा प्रकारांना थारा दिला जाऊ नये, अशी भूमिका व्यक्त केली आहे.
या निषेध पत्रावर अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, विश्वस्त किरण नाईक, शरद पाबळे, कार्याध्यक्ष शिवराज काटकर, सरचिटणीस सुरेश नाईकवाडे, कोषाध्यक्ष मन्सूरभाई शेख, मुंबई विभागीय सचिव दीपक कैतके, डिजिटल मीडिया परिषदेचे अनिल वाघमारे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Comments

Popular posts from this blog

केळवा सागरी पो. ठाणे व्दारे बेकायदा जुगार खेळणाऱ्या वर धाड, आरोपी सह मुद्देमाल ताब्यात

केळवेत अपघाती मृत्यूनंतर नागरिकांमध्ये संताप; चौकशीची मागणी

शिवसेना ( उबठा ) गटाचे डहाणू ता. प्रमुखासह शेकडो कार्यकर्त्यांचा मा. हितेंद्रजी ठाकूर ( आप्पा ) यांच्या उपस्थितीत ब. वि. आघाडी मध्ये जाहीर प्रवेश