स्मार्ट मीटर प्रकरणी अधीक्षक अभियंता मदन सांगळे यांचे निलंबन मागे घ्यावे : केदार काळे
स्मार्ट मीटर प्रकरणी अधीक्षक अभियंता मदन सांगळे यांचे निलंबन मागे घ्यावे : केदार काळे
पालघर, २६ जून (एच. लोखंडे)
स्मार्ट वीज मीटरच्या मुद्द्यावर ग्राहकांच्या भावना लक्षात घेऊन सकारात्मक भूमिका घेणारे पालघर येथील महावितरणचे अधीक्षक अभियंता श्री. मदन सांगळे यांचे निलंबन मागे घेण्यात यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा शिवसेना प्रवक्ते श्री. केदार काळे यांनी केली आहे.
सोमवार, दिनांक २२ जून २०२६ रोजी शिवसेना पालघर जिल्ह्याच्या वतीने स्मार्ट मीटरबाबत ग्राहकांच्या संमतीशिवाय मीटर बसवू नयेत, तसेच ग्राहकांवर कोणतीही सक्ती करू नये, या मागणीसाठी पालघर येथे मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी शिष्टमंडळाने अधीक्षक अभियंता श्री. मदन सांगळे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले होते.
या निवेदनानंतर श्री. सांगळे यांनी ग्राहकांच्या समस्या समजून घेत सकारात्मक प्रतिसाद दिला होता. ग्राहकांना माहिती देऊन व त्यांच्या भावना लक्षात घेऊनच स्मार्ट मीटर बसविण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिल्याचे सांगण्यात आले. तसेच यासंदर्भात स्मार्ट मीटर बसविणाऱ्या संबंधित ठेकेदार कंपनीला सूचना पत्र देण्यात आले होते.
मात्र, या निर्णयानंतर दोन दिवसांतच महावितरण कंपनीने श्री. मदन सांगळे यांचे निलंबन केल्याने जनतेमध्ये नाराजी असल्याचे श्री. केदार काळे यांनी सांगितले.
"ग्राहकांच्या भावना समजून घेऊन जनहिताचा निर्णय घेणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करणे योग्य नाही. श्री. मदन सांगळे यांचे निलंबन तात्काळ मागे घ्यावे," अशी मागणी त्यांनी केली.
याबाबत मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे तसेच पालघर विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री. राजेंद्र गावित यांची भेट घेऊन निलंबन मागे घेण्याची मागणी करणार असल्याचेही श्री. केदार काळे यांनी सांगितले.
Comments
Post a Comment