पालघर तालुका रोहिदास समाज सेवा संघातर्फे विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न
पालघर तालुका रोहिदास समाज सेवा संघातर्फे विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न
१४९ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; समाजभूषण पुरस्कारासह ६५ मान्यवरांचा सन्मान
पालघर (प्रतिनिधी): पालघर तालुका रोहिदास समाज सेवा संघ आणि संत रोहिदास समाज उत्कर्ष फंड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विद्यार्थी गुणगौरव समारंभ रविवार, दि. २१ जून २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता उमरोळी येथील संत रोहिदास सभागृहात मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात पार पडला.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून आंतरराष्ट्रीय खेळाडू व आयर्न मॅन म्हणून ओळखले जाणारे श्री. हार्दिक पाटील उपस्थित होते. तर विशेष अतिथी म्हणून राज्य पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक श्री. पुरुषोत्तम वर्तक सर यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान नूतन विद्यामंदिर उमरोळी संस्थेचे अध्यक्ष श्री. राजेश पाटील यांनी भूषवले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी दीपप्रज्वलन तसेच महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करून सोहळ्याला सुरुवात करण्यात आली. पालघर तालुका रोहिदास समाज सेवा संघाचे अध्यक्ष श्री. सुभाष पाटील यांनी प्रास्ताविक करताना समाजाच्या जडणघडणीचा आणि प्रगतीचा आढावा घेतला. विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून प्रगती साधावी, तसेच पालकांनी मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती देत सभागृहाच्या दुरुस्तीच्या कामासाठी सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
विशेष अतिथी श्री. पुरुषोत्तम वर्तक यांनी आपल्या प्रेरणादायी भाषणातून विद्यार्थ्यांना शिक्षण, मेहनत आणि सकारात्मक विचारांचे महत्त्व पटवून दिले. प्रमुख अतिथी श्री. हार्दिक पाटील यांनी जीवनात यश मिळवण्यासाठी शिस्त, सातत्य आणि आत्मविश्वास या गुणांची गरज असल्याचे सांगत विद्यार्थ्यांना यशाचा कानमंत्र दिला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. राजेश पाटील यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करत समाजाच्या प्रगतीमध्ये शिक्षणाची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगितले.
यावेळी समाजभूषण पुरस्कार देऊन समाजातील डॉक्टर, इंजिनिअर, उच्च गुणवत्ताप्राप्त विद्यार्थी तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या एकूण ६५ मान्यवरांचा शाल व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. तसेच इयत्ता १ ली ते ९ वीतील १४९ विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व स्कूल बॅग देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास पालघर तालुका रोहिदास समाज सेवा संघाचे अध्यक्ष सुभाष पाटील, कार्याध्यक्ष संदीप राऊत, उपाध्यक्ष जगदीश जाधव, सुधीर जाधव, नितीन जाधव, सरचिटणीस हरेश्वर जाधव, खजिनदार प्रकाश सातवे तसेच संत रोहिदास समाज उत्कर्ष फंडचे अध्यक्ष विलास सातवे, उपाध्यक्ष सुनील जाधव, सरचिटणीस प्रशांत जाधव, खजिनदार संतोष सातवे यांच्यासह दोन्ही संस्थांचे पदाधिकारी, विद्यार्थी, पालक, महिला वर्ग आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन संत रोहिदास समाज उत्कर्ष फंडचे उपाध्यक्ष सुनील जाधव आणि संघटनेचे सरचिटणीस हरेश्वर जाधव यांनी केले.
Comments
Post a Comment