TET पेपर फुटीप्रकरणी सूत्रधारांवर कठोर कारवाई करा - शिवसेना प्रवक्ते केदार काळे यांची मागणी
TET पेपर फुटीप्रकरणी सूत्रधारांवर कठोर कारवाई करा - शिवसेना प्रवक्ते केदार काळे यांची मागणी
पालघर (प्रतिनिधी - एच. लोखंडे), दि. २७ जून :
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत २८ जून २०२६ रोजी राज्यातील १ हजार २८ परीक्षा केंद्रांवर होणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पूर्वीच प्रश्नपत्रिकेच्या गोपनीयतेचा भंग झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी शिवसेना प्रवक्ते श्री. केदार काळे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत पेपर फुटीतील सूत्रधारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भिवंडी (जि. ठाणे) परिसरातील काही व्यक्तींकडे TET परीक्षेच्या संभाव्य प्रश्नपत्रिकेसंदर्भातील गोपनीय माहिती असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर भिवंडी पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापा टाकून कागदपत्रे ताब्यात घेतली. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली असता, ती जून २०२६ मधील शिक्षक पात्रता परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेशी संबंधित असल्याचे आढळून आल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेवर प्रतिक्रिया देताना शिवसेना प्रवक्ते केदार काळे म्हणाले की, परीक्षांमधील पेपर फुटीचे प्रकार वारंवार घडणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटणे हे शिक्षण क्षेत्रासाठी चिंताजनक असून, विद्यार्थ्यांचे भविष्य घडविणाऱ्या शिक्षकांच्या परीक्षेतील गैरप्रकार कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाऊ नये.
यापूर्वीही विविध स्पर्धात्मक परीक्षांमध्ये पेपर फुटीचे प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून पेपर फुटीमागील मुख्य सूत्रधार शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी श्री. केदार काळे यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच शिक्षण मंत्र्यांकडे केली आहे.
"वारंवार होणाऱ्या पेपर फुटीच्या घटनांमुळे शैक्षणिक महाराष्ट्राची प्रतिमा मलिन होत आहे. दोषींना कोणत्याही परिस्थितीत पाठीशी घालू नये," असेही त्यांनी स्पष्ट केले.
Comments
Post a Comment