गुलाबपुष्पातून सलोख्याचा संदेश; तारापूर पोलिसांकडून ईद-ए-मिलादच्या शुभेच्छा
गुलाबपुष्पातून सलोख्याचा संदेश; तारापूर पोलिसांकडून ईद-ए-मिलादच्या शुभेच्छा
तारापूर (प्रतिनिधी): सण-उत्सवांच्या माध्यमातून सामाजिक एकोपा आणि बंधुभाव अधिक दृढ व्हावा, या उद्देशाने तारापूर पोलिसांनी आगळ्या पद्धतीने ईद-ए-मिलादच्या शुभेच्छा देत शांतता व सलोख्याचा संदेश दिला. पोलिसांनी मुस्लिम बांधव, भगिनी तसेच लहान मुलांना गुलाबपुष्प देऊन ईद-ए-मिलादच्या शुभेच्छा दिल्या.
आगामी ईद-ए-मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर सोमवार, २४ ऑगस्ट २०२६ रोजी तारापूर पोलीस ठाणे आणि मुस्लिम सुन्नत जमात, तारापूर यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला. पालघरचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या आदेशानुसार तसेच बोईसरचे डी.वाय.एस.पी. बैसाणे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम आयोजित करण्यात आला.
यावेळी तारापूर पोलीस ठाण्याचे API प्रविण देशमुख, वाणगाव पोलीस ठाण्याचे API पाचपुते, चिंचणी पोलीस चौकीचे PSI नंदगावे, मुस्लिम सुन्नत जमातचे अध्यक्ष शोएब अत्तारी, चिंचणी मुस्लिम सुन्नत जमातचे कासिम मुछाले, मुख्तार गवंडी, नसरुद्दीन सोपरकर, राजू गवंडी, नौशाद सैनिला, सरफुद्दीन गवंडी, चिंचणी जमातचे मंजूर शेख, सादिक शेख, सलीम गवंडी, रफीक शेख, अल्लाबक्ष सोपरकर, शब्बीर दमनवाला यांच्यासह पोलीस अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.
पोलीस अधिकारी व अंमलदारांनी गावातील विविध भागात फिरून नागरिकांशी संवाद साधला. मुस्लिम बांधव, भगिनी आणि लहान मुलांना गुलाबपुष्प देत ईद-ए-मिलादच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच सण शांततेत, सलोख्याने आणि उत्साहात साजरा करण्याचे आवाहन करत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले.
पोलीस आणि नागरिकांमधील आपुलकी व विश्वासाचे नाते अधिक दृढ व्हावे, तसेच सर्वधर्मीयांमध्ये बंधुभाव, एकता आणि सामाजिक सलोखा कायम राहावा, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता.
पोलिसांच्या या उपक्रमाचे नागरिकांनीही स्वागत केले. गुलाबपुष्प देत दिलेल्या शुभेच्छांमुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. या उपक्रमातून तारापूरमध्ये पोलीस आणि नागरिकांमधील विश्वासाचे नाते अधिक घट्ट होत असल्याचे दिसून आले.
“सण कोणताही असो, आनंद सर्वांचा; शांतता, सलोखा आणि बंधुभाव हीच आपली खरी ओळख,” असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. शांततेच्या आणि उत्साहपूर्ण वातावरणात हा उपक्रम पार पडला.
Comments
Post a Comment