एडवण येथील अंगणवाड्यांची मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून पाहणीबालकांच्या पोषण, आरोग्य आणि पूर्व प्राथमिक शिक्षणाच्या सुविधांचा घेतला आढावा
एडवण येथील अंगणवाड्यांची मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून पाहणी
बालकांच्या पोषण, आरोग्य आणि पूर्व प्राथमिक शिक्षणाच्या सुविधांचा घेतला आढावा
पालघर(प्रतिनिधी), दि. २६ जीऑगस्ट : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी एडवण येथील तीन अंगणवाड्यांना भेट देऊन तेथील विविध सेवांची पाहणी केली. यावेळी त्यांनी बालकांना दिला जाणारा आहार, पोषण, पूर्व प्राथमिक शिक्षण तसेच उपलब्ध सुविधांचा आढावा घेतला.
अंगणवाडीतील बालकांच्या पोषणस्थितीची माहिती घेताना पोषण ट्रॅकरवरील वजन व उंचीच्या नोंदींचीही पाहणी करण्यात आली. बालकांच्या आरोग्य व पोषणस्थितीवर नियमित लक्ष ठेवावे तसेच पोषण ट्रॅकरवरील सर्व नोंदी वेळोवेळी अद्ययावत ठेवाव्यात, अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी संबंधित अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दिल्या.
अंगणवाडीच्या माध्यमातून बालकांना केवळ पोषण आहारच नव्हे, तर गुणवत्तापूर्ण पूर्व प्राथमिक शिक्षण मिळणे आवश्यक आहे. बालकांच्या शारीरिक, बौद्धिक आणि सामाजिक विकासाला चालना देण्यासाठी उपलब्ध सुविधांचा प्रभावी वापर करावा आणि आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
ग्रामपंचायतीत वृक्षारोपण
अंगणवाड्यांच्या पाहणीनंतर मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी ग्रामपंचायत एडवण येथे भेट दिली. यावेळी त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
या प्रसंगी ग्रामपंचायत पदाधिकारी तसेच संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. अंगणवाडी सेवांचा दर्जा, बालकांचे पोषण व आरोग्य तसेच पर्यावरण संवर्धनासाठी प्रशासनाच्या वतीने करण्यात येणाऱ्या उपाययोजनांवर यावेळी भर देण्यात आला.
Comments
Post a Comment